मित्रानो, १० वी चा निकाल लागून थोडे दिवस झाले. पालकांची आणि पाल्यांची, ‘पुढे काय करायचा, कुठे एडमिशन घ्यायचा’ याची धावपळ सुरु झाली. काय करायचा ते सुचत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे, गावातील, खेड्यातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.  दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची ही आज स्तिथी आहे, आणि ते अगदी नॉर्मल आहे.

निकाल लागल्यापासून माझ्या गावाच्या, अथवा आसपासच्या बऱ्याच लोकांचे फोन येऊ लागले. प्रत्येकाचे प्रश्न IIT, NIT , क्लासेस , आणि पुढं काय करायचा यावरतीच होते.

एक गोष्ट खूप छान आहे, ती म्हणजे मुलं आणि पालक उच्च-शिक्षणासाठी इच्छुक आहेत. म्हणून वाटलं की, याविषयी काहीतरी लिहावं. IIT , NIT याबद्दल माहिती द्यावी.

मी स्वतः या गोष्टींचा अनुभव घेतला आहे. माझंही शिक्षण गावात झालंय. १० वी ची परीक्षा झाल्यानंतर माझी आणि माझ्या वडिलांची अशीच अवस्था झाली होती. आणि त्यामध्येच योग्य मार्गदर्शक (मांडवे सर, विजेता अकादमी) भेटले. दहावी नंतर दोन वर्ष अगदी कसून तयारी केल्यानंतर  चांगला रँक मिळाला आणि NIT नागपूर येथे प्रवेश मिळाला. चार वर्ष संपताच एका कंपनीत नोकरी लागली होती. पुन्हा उच्चशिक्षण घ्यायच्या महत्वाकांक्षेमुळे ती सोडून CAT (Common Admission Test ) या स्पर्धापरीक्षेमधून IIM (भारतीय प्रबंध संस्थान) इंदोर येथे प्रवेश मिळाला. पदव्यूत्तर शिक्षण झाल्यानंर आज Senior Consultant म्हणून एका कंपनीत काम करतोय.  या सर्व प्रवासातून मी ही गेलो आहे. आणि मी करू शकत असेल तर नक्कीच कोणीही हे साध्य करू शकतं.

एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे लोकांना IIT, NIT काय, त्या वेगळ्या का? इतर कॉलेज मध्ये आणि  IIT, NIT मध्ये फरक काय ? (सगळे तर B.Tech देतात) असे बरेच प्रश्न आहेत. म्हणून वाटलं की थोडा यावरती लिहावं, IIT/NIT ची ओळख करून द्यावी..

भारत सरकारने भारतात उच्चशिक्षणाच्या आणि जागतिक दर्जाच्या काही संस्था निर्माण केल्या आहेत. जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, अभियंते निर्माण व्हावेत आणि भारताच्या प्रगतीत त्यांची मदत व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. त्यामधून १९५१ साली पहिली IIT (Indian Institute ऑफ Technology ) म्हणजेच भारतीय औद्योगिगी संस्थान पश्चिम बंगाल मध्ये खरगपूर येथे सुरु करण्यात आले. त्यानंतर अनेक IITs निर्माण केल्या गेल्या. आज टोटल २३ IITs  आहेत. महाराष्ट्रात मुंबई येथे IIT आहे.

भारतामध्ये बरेच प्रादेशिक अभियांत्रिकी कॉलेज होती जी अतिशय उच्च दर्जाच शिक्षण, आणि सुविधा पुरवत होती. अश्या संस्थांना आणखीन दर्जेदार आणि स्वायत्त बनवण्यासाठी  २००२ मध्ये या संस्थांना राष्ट्रीय प्रद्योगिकी संस्थान म्हणजेच नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि (NIT) चा दर्जा देण्यात आला. भारतात टोटल ३१ NITs आहेत.  महाराष्ट्रात नागपूर येथे NIT आहे.

IIT आणि NIT या जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक सोइ सुविधांनी परिपूर्ण अश्या संस्था आहेत. मोठा आणि निसर्गरम्य कॅम्पस, परिपूर्ण ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, आणि जागतिक दर्जाचे प्राध्यापक ही या संस्थांची वैशिष्ट्ये आहेत. याच बरोबर IIT आणि NIT चे परदेशातील बऱ्याच जागतिक दर्जाच्या संस्थांशी करार आहेत, ज्यामुळे या संस्था तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय अद्ययावत असतात. मुख्य म्हणजे संपूर्ण देशातून (आणि परदेशातून सुद्धा ), स्पर्धापरीक्षेअंतर्गत या मुलांची निवड केलेली असते. ज्यामुळे व्यक्तिमत्व विकासाला जी चालना मिळते ती अतिशय महत्वाची असते.

सध्या या संस्थांमध्ये JEE मेन्स, आणि JEE ऍडव्हान्स या परीक्षेमधून प्रवेश मिळतो. परीक्षा १२ वी नंतर असते, पण याला तयारी दोन वर्षाची (११वी आणि १२ वी) लागते. ही परीक्षा कठीण वाटत असली तरी, सातत्याने आणि जिद्दीने कष्ट करणाऱ्याला यश मिळते. तसेच योग्य मार्गदर्शन आणि परीक्षेचे अचूक स्वरूप लक्षात घेऊन केलेली तयारी नक्कीच पूरक ठरते.

फक्त महागड्या क्लास ला जाणे म्हणजेच पूर्ण तयारी नसते तर, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, विषयावरची पकड, केलेलं कष्ट आणि सराव यशापर्यंत घेऊन जातो. परीक्षा नक्कीच कठीण असते पण कष्ट आणि योग्य तयारी असेल तर ती नक्कीच सोपी ठरते. बऱ्याच वेळा मराठी माध्यमाच्या मुलांचा भीती वाटते. पण थोडा योग्य पद्धतीनं प्रयत्न केल्यास काही कठीण नाहीये.

मित्रानो, हि दोन वर्ष नक्कीच अतिशय महत्वाची आहेत. Social मीडिया चा जमाना आहे. वेळ वाया न घालवता या गोष्टींचा पूरक वापर करा. विषयांचा आवाका समझून घ्या. कंसेप्ट्स नेट समझून घ्या आणि त्यावरती असलेली भरपूर उदाहरण सोडावा. हळूहळू गणितांची काठिण्य पातळी वाढवत जा. भरपूर सराव करा आणि स्वतःचे १००% द्या, यश नक्की तुमचेच आहे.

या दोन वर्षात, पालकांनी मुलांच्या कष्टावर विश्वास ठेवणं आणि त्यांना प्रोत्साहन देना खूप महत्वाचा आहे. कधीकधी अपयश येईलही पण जर त्याने कष्ट केले असेल तर ते अपयशही पुढे यशात बदलून जाईल.

 

All the best.

नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा -vijaymgdm7@gmail.com

विजय मगदूम  (Senior Consultant-Financial Services)

B.Tech इलेक्ट्रिकल -NIT नागपूर (२०१४)

MBA- IIM Indore