९ फेब्रुवारी २०१४. इंजिनीरिंग च शेवटचा वर्ष. प्लेसमेंट आधीच झालेली तर काहीच टेंशन नव्हतं. कॅम्पस मधल्या Nescafe मध्ये निवांत कॉफी पित कॉलेजचे राहिलेले काही दिवस एन्जॉय करत होतो. चार वाजलेले आणि माझा फोन वाजला. काय माहिती, त्या दिवशी सकाळपासूनच खूप अस्वस्थ वाटत होतं.

या वेळी घरातून कधी फोन येत नसायचा. फोन उचलला, पलीकडून ‘पपा बोलत होते. थरथरत आवाज ऐकून खूप भीती वाटून गेली.
“आई चा छोटा असिसिडेन्ट झालाय. ICU मध्ये आहे. पटकन निघून ये.” माझ्या आज्जीला मी आई म्हणायचो.

एवढ बोलून फोन बंद झाला. काही समझलच नाही. खूप सारे विचार एका क्षणात मनात धिंगाणा घालत होते. ICU आणि छोटा असिसिडेन्ट? काहीतरी नक्की मोठा झाला होता. सौरभ, पूजा माझ्या सोबत होते. एक मिनिटाचाहि वेळ ना घालवता त्या दोघांनी माझं नागपूर – कोल्हापूर तिकीट बुक केला आणि साडे पाच ला माझा प्रवास सुरु झाला. १९ तास कधी निघून जातील आणि कधी घरी पोचतोय असं झाल होत. न राहून, जेवढे नातेवाईकांचे आणि गावातल्या लोकांचे नंबर माझ्याकडे होते, ते डायल करायला सुरवात केली.

अस नक्की कोणीतरी असत जे तुमच्या मानसिक स्तिथीचा विचार ना करता बोलून जातं . असच एका नातेवाईकांन मला एका वाक्यात सांगून टाकल – “आईचा आसिडेन्ट झालाय. ST – बस वेगात होती आणि अंगावरून गेली. आई नाहीय आता. गडबड नको करू.”

काही क्षणातच सगळं संपला होता.

रात्र कशी निघून गेली माहिती नाही. दुसऱ्या दिवशी घरी पोचलो तेंव्हा कळलं की फक्त आई नाही तर आईसोबत माझी आजोळची आज्जी (मम्मी ची आई) पण होती. आणि आम्ही दोघीना हरवून बसलो होतो.

एका मोटर सायकल वाल्याला गडबड होती. तो wrong side ने आला , आणि त्याला चुकवण्याचा नादात बस ने ३ लोकांना ठोकर दिली होती. माहिती नाही की, इतकी गडबड करून त्याचा किती वेळ वाचला असता. ते दोन क्षण वाचवण्याच्या नादात ३ लोक आपल्या प्राणाला मुकली होती. आणि दोन कुठुम्ब आपल खूप काही हरवून बसली होती.

लोक मला विचारतात की, प्रगत देशात एवढा काय वेगळ आहे? इथं माणसाला किंमत आहे. एकदा वाटसरू जर रस्ता क्रॉस करत असेल तर सगळी वाहनं आपोआप थांबतात आणि “You फर्स्ट Sir. (आधी तुम्ही जा), असा म्हटलं जातं. सिग्नल, वाहतुकीचे नियम कोणी तोडत नाही. इतकेच नाही तर रस्त्यावर तुम्हाला हॉर्न चा आवाज पण येणार नाही. लोकांच्या आयुष्याची किंमत या लोकांना नक्कीच माहिती आहे आणि त्याचा आदर केला जातो. तुम्ही ६० किलोमीटर च्या वेगाने जात असला आणि ७० ने गेला तर २ ते ३ मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही वाचणार. पण एखाद्याच्या आयुष्याचा नुकसान मात्र नक्की होऊ शकत.

आपले आणि इथले नियम सारखेच आहेत, पण माणसाचा दृष्टीकोन (Attitude) वेगळी आहे, जी या देशांना महान बनवते. माहिती नाही, आपली attitude कधी बदलेल. आणि , “काय होतंय, तोड सिग्नल. मामा नाही इथं” हे बंद होईल.

आजही आईची आठवण थांबत नाही. तिने गालावरून फिरवलेल्या हाताची सर कशालाही येत नाही.